विद्यार्थ्यांनी साकारले शिवकालीन गडकिल्ले, मनमाडमध्ये शिवजयंती उत्साहात
मनमाड: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे मनमाड शहर पोलिस आणि मनमाड-नांदगाव मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून प्रतापगड, सिंहगड, पद्मदुर्ग, रायगड, पन्हाळा, मुरुड, जंजिरा यासह विविध शिवकालीन गड किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारत छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना दिली.
मोबाईलच्या स्क्रीनवर वेळ घालवणाऱ्या मुलांचे हात माती आणि चिखलाने माखले गेले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे या स्पर्धेत मुस्लिम विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा तसेच किल्ल्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाचा अभ्यास केला.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गड किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला शिवप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.